मुख्य सामग्रीवर वगळा

शृंगार १६

आजचा दिवस वाईट गेला , रात्री झालेल्या खराब झोपेमुळे मूडही खराब होता . दुपारी मंजूला फोन केला पण फारसं काही बोलली नाही ती . नेहमी इतकी बोलते , काही नाही तरी राग राग करते तस आज काहीच नाही . एकदम चुकल्या-चुकल्यासारखं वाटल . अशी का वागली असेल ती ? या प्रश्नाचे उत्तर काही मिळत नव्हतं . दिवसभर याच विचारामुळे कामातही लक्ष लागलं नाही . याच विचारात घरी पोहोचलो . मंजूला एक-दोनदा फोन केला तर तिने काही उचलला नाही . त्यामुळे मला आता जास्तच काळजी वाटू लागली . याच विचारात होतो तेव्हढ्यात मागे कोणाचीतरी चाहूल जाणवली म्हणून मागे वळून पाहीलं तर राधिका उभी होती .



" अग तू ? कशी आहेस ? "

" तुम्ही ठीक आहात ना ? बाहेरचा दरवाजा उघडाच आहे लॅच की तशीच अडकवली आहे . काळजी वाटली म्हणून पहायला आले . "

" अग थोडा विचारतच होतो त्यामुळे लक्षात नाही आलं . "
 अस म्हणत मी चावी घेण्यासाठी बाहेर जाऊ लागलो . तेव्हढ्यात तिने माझ्यासमोर हात वर केला आणि हातातली चावी दाखवली .

" ही घ्या आणि आता विचार न करता स्वस्थ बसा . मी पाणी देऊ का तुम्हाला ? "

" नाही नको मी ठीक आहे आता . "

" तुम्ही आजकाल टेरेसवरपण येत नाही . "

" नाही गं , बस नाही येता आलं , थोडा बिझी होतो . "

" कशात विचारात ? "

" अगदी तस नाही पण नाही जमलं . "

" इट्स् ओके एवढे काय एक्सप्लनेशन द्यायची गरज नव्हती . आता विचार नका करू आणि जाऊन जेवा आता . "

" एवढ्यात ? "

" कोणत्या जगात आहात ? मी जेवूनही आले . अजून थोडा वेळ केला तर बाहेर जेवणही नाही मिळणार . आवरा आणि या जेवून . "

" हो . आवरतो माझं . पण वेळाच  लक्षातच आल नाही माझ्या . "

" असू द्या , आवरा आता . मी येते . "

माझं काय चाललय ? किती वेळ झाला ते कळलही नाही असो आता येतो जाऊन .
रात्री झोपायच्या आधीही फोन करावा का नको असा विचार केला . पण आज तीचं मन थोडं अशांत असायचं आणि मी त्यात सारखा फोन करायचो . याने तिला त्रासच व्हायचा . नको , आज नको करायला फोन . उद्या करू फोन . आजही रात्री झोपेचे तिन तेरा वाजलेले . सलग दोन दिवस वाईट झोप झाल्यामुळे सकाळी फारच वाईट मूड होता . पण तरीही सगळं आवरून ऑफिसला जायला निघालो . आधीच वाईट मुड होता त्यात पूजा समोरून आली . मला तिच्याशी आता अजिबात बोलण्याची इच्छा नव्हती . त्यामुळे तिला सरळ इग्नोर करत पुढे निघालो . तेव्हढ्यात तिने आवाज दिला

" मला इग्नोर करता आहात का ? "

" नाही , तस नाही जरा घाईत आहे . " पर्याय नसल्यामुळे फारसं थांबलो नाही तरी एवढ बोलावच लागलं . तीही सोबतच येत होती .

" कुठे निघाला आहात ? "

" ऑफिसला "

" मीही येते आहे बरोबर . "

" कुठे ऑफिसला ? "

" अगदी तिथपर्यंत नाही पण काही प्रवास आपण सोबत करू शकतो ना . "

मि तिच्याकडे वळून पाहील , ती माझ्याकडेच पहात होती . पण तरीही शक्य तितक्या कोरडेपणानेच तिला म्हटल
ं
" मला लेडीज कंपार्टमेंटमधे प्रवेश नाही मिळणार . "

ज्याला फार कधी तोडून बोलण्याची सवय नाही त्याने तस बोलण्याचा प्रयत्न करणे किती हास्यास्पद होऊ शकतो हे आताच अनुभवत होतो . मला पटकन तस बोलायला काही सुचलं नसल्यामुळे काहीतरीच बोलून बसलो होतो .

" पण आपल्याकडे फक्त जेन्टस् साठी अस वेगळ कंपार्टमेंट नसत ना , मी येऊ शकते ना तुमच्यासोबत . "

" आता यावेळी ? खूप गर्दी असते . त्यात तू कशी येणार आहेस . "

" होते हो जागा . "

हे मात्र खर होत . अगदी कितीही गर्दी असलीतरी लेडीजला जागा होतेच . त्यामुळे माझ्याकडे आता कोणताही मुद्दा नव्हता . त्यामुळे आता तिचं ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता . स्टेशनवर पोहोचलो . लवकरच लोकल आली आणि फार प्रयास न पडता दोघांनाही आत जाता आलं . अपेक्षेपेक्षा हे फारच सोप झालं होतं . मी तिच्या शेजारीच पण सुरक्षित अंतर ठेऊन उभा होतो . तेव्हढ्यात तिने मला काहीतरी सांगण्यासाठी जवळ बोलावलं . आणि माझ्या कानात शेजारचा माणूस तिच्या फार जवळ येतो आहे अस सांगितलं . त्यामुळे मला आता तिला कव्हर करून उभ राहण आवश्यक होतं . त्या माणसाला थोडं बाजूला सरकायला सांगून मी तिच्या समोर उभा राहिलो आणि एक हात तिच्या बाजूने घेऊन तिच्या पाठीमागे असलेल्या बारला पकडला . आता ती ब-यापैकी प्रोटेक्टेड होती . येणा-या स्टेशनांवर गर्दीचा लोंढा आला की हातावर तो सगळा भार सहन करावा लागत होता . असं करत शेवटी उतरलो स्टेशनवर . ऑफिसला थोड्या वेळाने गेलो असतो तरी चालले असते पण मला थांबायच  नव्हत म्हणून मी निघालो . तेव्हढ्यात ती बोलली

" मला थोडं बोलायचं आहे तुमच्याबरोबर ."

" अग आता उशीर होईल गं ऑफिसला . आपण नंतर बोलूया ना निवांत . "

" मी जास्त वेळ नाही घेणार तुमचा . प्लीज . "

" ठीक आहे बोल . "

" इथे असच ? थोड बसूया ना कुठेतरी . "

" अगं आधीच उशीर होत आहे . बर चल . "

ऑफिसकडे जाताना एक बाग आहे तिथे गेलो आणि मग तिला विचारलं

" काय आहे एवढ महत्त्वाच जे तू इतक्या गडबडीच्या वेळी इतक्या गर्दीतून आणि इतक्या दूर आलीस ? "

" कुठून सुरूवात करू हे समजत नाहीए . पण तुम्हाला उशीर होईल म्हणून पटकन सांगते . पण हे अस सांगायचं म्हणजे ..."

माझ्या चेह-यावर अजूनही कोरडेपणाच आणि उशीर होत असल्याची सूचकता होती . त्यामुळं तिनं स्वतःला सावरल आणि बोलू लागली .

" मला तुम्ही आवडता . का , कस , कधी माहीत नाही पण आवडता . "

" माझ लग्न झाल आहे . "

" हो . तुमचा तुमच्या बायकोबरोबर काय इशू आहे ते मला माहिती नाही . ते सॉर्टआऊट झाल तर चांगलच आहे . किंवा नाही झाल आणि तुम्ही पुढील आयुष्यात माझ्या व्यतिरिक्त इतर कुणाचा विचार करणार असाल तरीही माझ काही म्हणन नाही . मी फक्त मला काय वाटत ते तुमच्यापुढे व्यक्त केल इतकच . तुम्ही आणि तुमची वाईफ अजून एकत्र असताना मी पुढच इतक बोलण तुम्हाला ठीक नाही वाटणार पण मला हे सगळ अश्यक्य झाल होत म्हणून तुम्हाला सांगाव लागल . तस हे मी स्पष्ट-अस्पष्टपणे सांगितलं होत पण एकदा हे पूर्णपणे सांगण गरजेच वाटल म्हणून हे सगळ ."

ती घडाघडा बोलून मोकळी झाली .

" इतर सगळं जाऊदे पण हे तू किती स्पष्टपणे सांगितलंस अगदी  सगळ्या पर्यायांसोबत , किती मॅच्युअर आहेस . मी आतापण इतका मॅच्युअर आहे की नाही हे सांगता यायच नाही . बाकी तू जे सांगितलं त्यात आम्ही दोघे सोबतच आहोत त्यामुळे असा विचार मी नाही करू शकत . पण तू हे जस बोललीस त्यामुळं तुझ्याबद्दल फार रिस्पेक्ट वाटतो आहे ; आधीही होताच पण आता त्यापेक्षा जास्त वाटतो आहे .
  तू तुझा हा कॉन्फीडंस आणि स्पष्टपणा तुझ्या आयुष्यात , तुझ्या करीयरमध्ये आण तुला त्याचा फार फायदा होईल . "

त्यावर तिने एक स्माईल दिली आणि पुढे म्हणाली

" इट्स् ओके . पण आपण फ्रेंड्स म्हणून तर राहू शकतो ना ."

" हो नक्कीच . पण एक सांग तू कधी एकेरी बोलते कधी अहो-जाहो . "

" एकेरी अधिकाराने बोलते आणि ..." तिच्या पापण्या खाली झुकल्या , मानही किंचित खाली झाली . काही क्षणच तिची नजर खाली होती . मग ती तशीच वळली , अगदी मुद्दाम माझ्याकडे बघायच टाळल्यासारखी . आणि " येते मी " अस अस्पष्टस बोलत निघालीही .
    ...क्रमशः

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उत्तर

        आपल्या सोबत अस का होतय याच उत्तर त्याला काही केल्या मिळत नव्हत . आपण तर सगळ्यांसोबत चांगलच वागतो पण लोक आपल्याशी अस का वागतात ? नेहमीच आपल्याला गृहीत धरल जात . आपल्या मताचा , मनाचा कुणाला विचारच नसतो . आपली आठवण फक्त त्यांना गरज असेल तेव्हाच येते . अशावेळी हे सगळ्यात आधी आपल्यालाच विचारतात , पण जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांना आपली आठवणही येत नाही . तेव्हा त्यांना त्यांचे मित्र असतात . छे कुणाला मदत करावी की नाही . आयुष्यातही असच होतय सतत आपल्याला डावलल जात . त्याला त्याच्या चांगूलपणाची चीड आली होती . काय कराव किती प्रयत्न केले पण असच वागतो आपण दरवेळेस , हा आपला स्वभावच झाला आहे आणि तो बदलताही येत नाहीये . तो स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होता , आणि आतून तडफडत होता . तेव्हढ्यात कुणीतरी पटकन जवळ आल , तो आपल्या विचारातून बाहेर येऊन कोण आहे ते पाहणार तेव्हढ्यात त्याच्या गळ्यावर काहीतरी अणकुचीदार वस्तू टेकवली गेली .

अनवट वाट ३

   " तुझ्याशी बोलताना किती वेळ गेला तेच समजलं नाही , खूप उशीर झाला आता , आता मला जायला हवं . "    " अगं एव्हढा वेळ काय बोलत होतो आपण ? आणि आता तू जायचं म्हणतेय . "    " म्हटलं ना खूप उशीर झालाय आता , चुकले असले तरीही आता फार पुढं निघून आले आहे मी , आता माघारी नाही फिरू शकत , तुला भेटले , बोलले छान वाटलं पण विचार केला मी , हे लोक खूप मोठे आहेत , आणि मी यांच्या मान सन्मानाची गोष्ट आहे , मी तुझ्यासोबत जाण्याचा विचार जरी केला तरीही ते तुझं काहीतरी बरंवाईट करतील आणि म्हणून नको , मनाने राहीन सोबत, पण खरोखर तुझ्या सोबत येण्याचा विचारही नाही करू शकत . "